" चला रक्तदान मोहीम राबवूया , रक्तदान करून जीव वाचवूया"

Subsidiary

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव

१३ जुलै, १९५३ रोजी जळगाव येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगावची स्थापना झाली. या संस्थेचे दिल्लीत मुख्य कार्यालय असून राष्ट्रीय पातळीवर भारताचे महामहीम राष्ट्रपती, राज्य पातळीवर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि जिल्हा पातळीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असतात.याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव. ही आंतरराष्ट्रीय मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोणातून अव्याहतपणे कार्यरत असून लोकाभिमुख सेवा कार्य करण्याच्या उद्देशातून कार्य करीत आहे.

सदैव सेवेत तत्पर रक्तपेढी

संस्थेचा प्रमुख उपक्रम म्हणून १९८० साली रक्तपेढीची स्थापना करण्यात आली. रक्तपेढीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सुरळीत व सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरवठा व्हावा म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी तत्पर असतात. आजच्या परिस्थितीत दरवर्षी जवळ जवळ २५००० रुग्णांना सुरळीत रक्तपुरवठा करण्यात यशस्वी होत आहोत. रक्तसंकलनासाठी दोन वातानुकूलित मोबाइलला व्हॅन कार्यरत आहे. रक्तपेढीची २४ तास निरंतर सेवा. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून व रक्तदानातून आत्मिक समाधान मिळते. "रक्तदान करूया.. प्रेमाची नाती जोडूया" संकल्पनेतून सर्व सतत कार्यरत आहोत. १००% स्वेच्छा रक्तदानाचे उद्दिष्टपूर्तीकरिता रक्तदानाचे चळवळ अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

वातानुकूलित डोनर मोबाईल व्हॅन

रक्तपेढीत नियमित रक्त पुरवठा राहावा म्हणून सर्व समाजाने रक्तदानात पुढाकार घ्यावा, समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वेच्छा रक्तदान प्रचार-उपक्रमांतर्गत रेडक्रॉस रक्तपेढीचे वातानुकूलित "ब्लड डोनर व्हॅन रक्तदातांच्या दारी" या संकल्पने अंतर्गत जळगाव शहर व जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी जाऊन रक्तदानाचे महत्व विदित करून रक्तसंकलन केले जाते. दररोज सकाळ संध्याकाळ जनसंपर्क अधिकारी, समुपदेशक, समन्यवयक वैद्यकीय पथकासह जळगाव शहरात ठिकठिकाणी चौकाचौकात वातानुकूलित डोनर मोबाईल व्हॅन उभी करून जनसंपर्क करून जनतेच्या मनात रक्तदानाविषयी जनजागृती करून रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते.

रक्तदात्यांची काळजी

  • प्रत्येक रक्तदात्याचा गौरव पत्र देऊन सन्मान
  • प्रत्येक रक्तदाताच्या रु.५० हजाराचा अपघाती विमा संरक्षण
  • स्वेच्छा रक्तदान करणाऱ्या पुरुष रक्तदात्यास रुपये ३००/- चे सवलत कार्ड.
  • महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून महिला रक्तदात्यास ४००/- रुपयांची सेवाशुल्कात सवलत.
  • रक्तदान करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उ.म.वि. च्या अध्यादेशानुसार २ अतिरिक्त गुण.
  • स्वतःसाठी रक्त पिशवी लागत असल्यास स्वतःच्या रक्तदाता प्राधान्य कार्डवर विनामूल्य रक्तपिशवी दिली जाते.

  • थेलेसेमिया ग्रस्त रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा

    रेडक्रॉस रक्तपेढीतर्फे थेलेसेमिया रुग्ण असलेल्या मुलांसाठी विनामूल्य रक्तपिशवी उपलब्ध करून दिली जाते व थेलेसेमिया रुग्ण मुलांची काळजी घेतली जाते. गेल्या दहा वर्षाच्या रक्तपेढी कामकाजाचा आढावा घेता ११००० रक्तघटत थेलेसेमिया, सिकललेस व अप्लास्टिक ऍनिमिया बाधित रुग्णांना विनामूल्य (दीड कोटी रुपये सेवाशुल्काचे) देऊन त्यांना जीवनदान देण्यात यश मिळाल्याचा आनंद आहे. दरवर्षी ८ मे जागतिक थेलेसेमिया दिनी थेलेसेमिया ग्रस्थ रुग्णांना त्यांच्या समवेत पालकांना घेऊन साजरा केला जातो.

    जीवनदान व भावस्पर्श योजना

    भावस्पर्श योजने अंतर्गत आपण फक्त रु.१०००/- रकमेची देणगी देऊन वर्षभरात एक रक्तपिशवी व जीवन दान योजने अंतर्गत रु.१००००/- देणगी देऊन आपण दर वर्षी एक रक्तपिशवी गरजू व गरीब रुग्णाला विनामूल्य देण्यात येईल. सामाजिक कृतज्ञता म्हणून भावस्पर्श व जीवंदन योजनेत सहभागी होऊ शकतात. आपल्या नातेवाईक व्यक्तींच्या स्मरणार्थ, आपल्या व आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस, श्रद्धेय व्यक्तींची जयंती, स्मृती दिवस, पुण्यतिथी, संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त या योजनेत सहभागी व्हा किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन करा. रेडक्रॉसच्या देणगीदारास देणगीमध्ये आयकारात ८०जी प्रमाणे सुटही मिळते.

    जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना

    सामाजिक न्याय या अधिकारीता मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार द्वारा अतिदुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसमावेशक सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांचे शारीरिक मानसिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्वरूपाचे सर्वांगीण पुनर्वसन होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्धेशाने जिल्हास्तरावर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले.

    जळगाव येथील DDRC केंद्र हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव या आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा अपंग पुनर्वसन हे तत्परतेने व मनोभावे सेवा सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर राहण्यासाठी कटिबद्ध आहेत.

    जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राची ध्येय व धोरणे

  • जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना आवश्यक सेवा, सुविधांची नोंद करणे
  • शिबिरांचे व मेळाव्याचे आयोजन करणे
  • दिव्यांग व्यक्ती व पालक यांचे समुपदेशन करणे त्यांना मार्गदर्शन करणे
  • दिव्यांग व्यक्तींना लागणारे सहाय्यक साहित्य व उपकरणे तज्ज्ञांकडून निर्देशित करून त्यांचे योग्य मोजमाप घेऊन त्यांना साहित्य उपलब्ध करून देणे.
  • कृत्रिम अवयव, उपकरणे यांची दुरुस्ती करून देणे.
  • दिव्यांगत्वानुसार त्यांना आवश्यक चिकित्सात्मक सेवा तज्ञामार्फत उपलब्ध करून देणे.
  • सायकोथेरेपी, फिजीओथेरपी, स्पीचथेरेपी, ओक्युपेशनल थेरेपी व मार्गदर्शन करणे.

  • जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीने उपलब्ध सेवा सुविधा

  • मानसोपचार विभाग
  • फिजियोथेरिपी विभाग
  • वाचा उपचार थेरेपी विभाग
  • कृत्रिम अवयव व उपकरणे निर्मिती विभाग
  • Youth Redcross

    ज्युनिअर व युथ रेडक्रॉस

    ज्युनिअर व युथ रेडक्रॉस ही आरोग्य व स्वच्छता सेवा व मैत्री या तत्वांवर विश्वबंधुत्व, मानवता आणि सेवशीलतेचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत ही भावना सतत वाढिस लागावी अशा संकल्पेनेतून संघटनेची स्थापना झालेली आहे. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या शाखेचे सभासद होशकतात. या अंतर्गत इंडियन रेडक्रॉस सोडायटी जिल्हा शाखा, जळगावने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल, अभिनव विद्यालय , उजवल इंग्लिश मिडीयम स्कुल, येथे ज्युनिअर रेडक्रॉसची स्थापना व बाहेती कॉलेज, जळगाव व पहुर पाळधीचे स्वराज ग्रुप येथे युथ रेडक्रॉसची स्थापना करण्यात आली आहे.

    प्रथमोपचार व प्रशिक्षण

    शासकीय , निमशासकीय, कंपन्या , कारखाने इत्यादी ठिकाणी कामगारांना आवश्यक लागणारे मान्यता प्राप्त प्रथमोपचार प्रशिक्षण याचे वर्ग आयोजित करून कामगारांना तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण करण्यात येते. आजपर्यंत ३०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून काही ठिकाणी कामगारांनी व समाजसेवकांनी प्रशिक्षण घेतले आहे. स्वयंसेवकांना या प्रशिक्षणाचा खूप उपयोग ही झाला आहे. भविष्यात जिल्हास्तरावर प्रथोमपचार प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे.

    आपत्ती व्यवस्थापन

    आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जळगाव आणि जिह्याबाहेर कुठेही काही आपत्ती किंवा कोणती ही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटना घडल्यास त्यांना तत्काल करवायजी मदत व उपचार करण्याची संपुर्ण प्रशिक्षण रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत देण्यात येते.

    जेनेरिक मेडिसीन (जनऔषधी) स्टोअर्स

    जेनेरिक औषधिंचा प्रचार व्हावा यासाठी शासकीय स्तरावरही खूप प्रयत्न केले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात ही जेनेरिक औषधींचा प्रचार व प्रसार व्हावा व सर्व सामान्य जनतेला जेनेरिक औषधींची माहिती व्हावी म्हणून जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रेडक्रॉसने पुरस्कृत केलेल्या पाच जेनेरिक औषधी उपलब्ध आहे.

  • पुष्पराज मेडिसीन अँड जनरल , दु.क्र.३, संस्कृती रेसिडन्सी, नवजीवन सुपरशॉप मागे, मानराज पार्क जवळ, जळगाव
  • फुलफगर फार्मा. जी-६,लक्ष्मी प्लाझा, विसनजी नगर, क्रांती ट्रेडर्स समोर, जळगाव
  • एशवर्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्स , साची अपारमेन्ट, महाबळ कॉलोनी, भारत गॅससमोर, जळगाव.
  • श्रीपाद जेनेरिक क्लिनिक अँड रेवती मेडिको जेनेरिक औषधलय, श्री गुरुदत्त मंदिरा समोर , शनीपेठ, जळगाव।.
  • ओम शिवसाई जेनेरिक मेडिसीन स्टोअर्स, कमल लॉन्सच्या मागे जुना खेडीरोड जवळ , महादेवमंदिर समोर ,जळगाव.
  • NAT

    नॅट म्हणजे (न्यूक्लिक ऍसिड टेस्ट) सर्वाधिक रक्त पुरवठा करण्याकरिता जागतिक दर्जाचे प्रभावी तंत्रज्ञान प्रत्येक रक्तदात्याने दिलेल्या रक्तावर ते रक्त साठवून ठेवण्यापूर्वी एच. आय. व्ही., हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया, सिफिलीस इ. घातक संसर्ग होऊ नयेत या करिता विविध प्रकारच्या चाचण्या सामन्यात: एलायझा नावाच्या तंत्राने केल्याने जातात.

    रोश कंपनिद्व्यारे नॅट रक्ताची चाचणी करीता पी. सी.पी. आर. (Poliymerease Chain reaction) हे आधुनिक तंत्रज्ञान वापरते. या तंत्रज्ञानामध्ये जणूकातील डी. एन. ए. (DNA) सेगमेंटचे विभाजन केले जाते व विभाजित केलेला सेगमेंटच्या करोडो कॉपीज बनविल्या जातात यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव झालेल्या सेगमेंटचे ही डुप्लिकेशन होते व रोगाचे निदान लवकर केले जाते.

    नॅट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रतिजन, प्रतिपिंड (Antigens and Antibodies)ऐवजी थेट रक्तातील संक्रमित जनुके (DNA/RNA) शोधून काढली जातात. त्यामुळे विंडो पिरियड कित्येक पटींनी कमी होतो आणि रुग्णास रक्त संक्रमनातून एच. आय. व्ही.(HIV) विषाणूंचा प्रादुर्भाव व्यावहारिक पातळीवर नष्ट होतो.

    हे तंत्रज्ञान संपूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानव निर्मित त्रुटी पूर्णपणे टाळल्या जातात. या तपासण्यासाठी लागणारे सेवाशुल्क प्रयोगशाळा साहित्य, रसायने इत्यादीसाठी खर्च लक्षात घेता योग्य सेवाशुल्क घेऊन रक्त व रक्तघटक रक्तपेढि मध्ये उपलब्ध झालेले आहेत.

    ई सेतू व आधार सुविधा केंद्र

    रेडक्रॉस भवन येथे ई सेतू सुविधा केंद्र व आधार सुविधा केंद्र शासकीय सेवाशुल्कात सुरू करण्यात आले असून उत्पन्न दाखला , आधार कार्ड (नवीन दुरुस्ती),७/१२ उतारा , ह्यातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र), उद्योग आधार, पॅन कार्ड , वय , अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला , ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट , नॉन क्रिमिलिअर ,परीक्षा /नोकरी , जेष्ठ नागरिकत्व ,परीक्षा /नोकरी,ऑनलाईन फॉर्म, जी.एस.टी. रिटर्न, चरित्र पडताडणी(पोलीस व्हेरिफिकेशन,इन्शुरन्स, महिला ३३%आरक्षण प्रमाणपत्र, वीजबिल भरणा सर्व प्रकारचे प्रतिज्ञा पत्र , एस.ई. सी. प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड इत्यादी सेवा उपलब्ध कराण्यात आलेली आहे व त्यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आले असून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी रेडक्रॉस भवन सिव्हील हॉस्पिटल शेजारी ,न्यू बी.जे.मार्केट जवळ जळगाव येथे सुरू आहे.

    दिव्यांग बांधवांना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी,(UDID)सक्तीची करण्यात आलेली आहे .या नोंदणी मुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ घेणे शक्य होईल. म्हणून दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी,(UDID), बस सवलत पाससाठी नोंदणी या सुविधा अल्पदरात रेडक्रॉस भवन येथे उपलब्ध केल्या आहेत. बहूसंख्य दिव्यांग बांधव या सुविधेचा लाभ घेत आहेत .

    कार्यकारणी मंडळ